अधिक मासानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन; जनसेवा व समाजकल्याणासाठी घेतले आशीर्वाद

वारकरी संप्रदायाची अखंड भक्तीपरंपरा, संतांचा विचार आणि “भक्ती, समता व मानवता” यांचा संदेश देणारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अधिक मासानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. निराकार तू निर्गुण ईश्वर… तरी माझ्यासाठी साकार होऊन विटेवर उभा आहेस…” अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी आपल्या भक्तिभावना व्यक्त केल्या. मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण, “विठ्ठल-विठ्ठल” नामाचा अखंड गजर आणि अध्यात्मिक ऊर्जा अनुभवताना मन समाधानाने व शांततेने भरून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी चंद्रभागा नदीतील भक्त पुंडलिक दर्शन, नामदेव पायरी दर्शन तसेच संत चोखा मेळा समाधी स्थळास भेट देऊन दर्शन घेतले. वारकरी परंपरेतील संतांच्या विचारांना अभिवादन करत समाजात समता, मानवता आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख, समृद्धी, भरभराट आणि उत्तम आरोग्यासाठी श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना अर्पण करण्यात आली. जनसेवेचे कार्य अधिक ताकदीने सुरू ठेवण्यासाठी बळ मिळावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती आणि प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची माहितीही खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली.

यावेळी तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, किरण घाडगे, आदित्य फत्तेपूरकर, संदीप शिंदे, व्यंकटेश कुलकर्णी, सादिक मुलाणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.