निवडणुकीच्या रणधुमाळीत अनपेक्षित भेट; धैर्यशील मोहिते-पाटीलांच्या हालचालींनी चर्चांना उधाण
सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय
वातावरण तापलेले असताना एका अनपेक्षित भेटीमुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोमवारी महायुतीच्या शिवसेना
खासदार ज्योती वाघमारे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचे
छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क
रंगू लागले आहेत. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून माजी आमदार राजेंद्र
राऊत तर महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही
गटांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून प्रचाराला वेग आला
आहे.
दरम्यान, धैर्यशील मोहिते-पाटील आणि वसंत देशमुख
यांनी ज्योती वाघमारे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली. या भेटीमुळे निवडणुकीच्या
समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, यावर
प्रतिक्रिया देताना खासदार ज्योती वाघमारे यांनी कोणत्याही राजकीय अर्थाला नकार
दिला आहे. भारतीय संस्कृतीनुसार घरी आलेल्या व्यक्तीचे स्वागत करणे ही परंपरा
असल्याचे सांगत त्यांनी महायुतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यातील
सर्व विधान परिषद जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा
विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत
निवडणुकीत महायुतीच बाजी मारेल असा दावा केला. स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणुकांमधील निकालांचा उल्लेख करत विरोधकांच्या दाव्यांवरही त्यांनी निशाणा
साधला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत सोलापूरमध्ये
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय
रणनीतीचीही चर्चा सुरू आहे. आगामी मतदानापूर्वी आणखी कोणती राजकीय घडामोड घडते,
याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.