मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी; सरकारचा मोठा निर्णय, तातडीने जीआर जारी

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. अंतरवाली सराटी येथील आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आंदोलनातील मृत व्यक्तींच्या वारसांची पडताळणी करून पात्र लाभार्थींना प्रमाणपत्रे देण्याच्या सूचना केल्या आहेत. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सुरुवातीला संबंधित वारसदारांना राज्य परिवहन महामंडळात सामावून घेण्याचा विचार होता. मात्र, काही कुटुंबांनी एमआयडीसी किंवा महावितरणमध्ये नोकरीची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संचालक मंडळाकडूनही त्यास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या विविध आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील असून भविष्यातही सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.