तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा महत्त्वाचा निर्णय
दक्षिण भारतातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून भाजपचे
वरिष्ठ नेते अन्नामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा
राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय
अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केल्याचे सांगितले जात आहे.
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नामलाई यांना काही
महिन्यांपूर्वी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या
जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षातील अंतर्गत
मतभेद आणि नाराजीच्या चर्चांना वेग आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनाम्यापूर्वी अन्नामलाई यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि संघटन सरचिटणीस बी.
एल. संतोष यांच्यासोबतही चर्चा केली होती. पक्ष नेतृत्वाकडून त्यांची मनधरणी
करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अन्नामलाई हे तामिळनाडूमध्ये स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या
तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत
कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या त्रिभाषा
धोरणावर अन्नामलाई यांनी सार्वजनिकरित्या विरोध दर्शवला होता. यामुळे केंद्रीय
नेतृत्व आणि त्यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. अन्नामलाई यांनी
माध्यमांशी बोलताना येत्या दोन दिवसांत आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अधिकृत
घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये कायम राहणार की
नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.