बार्शी क्रिकेट समर कॅम्प दुर्घटना; 15 वर्षीय आरवच्या मृत्यूप्रकरणी आयोजक व प्रशिक्षकांवर गुन्हा

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगा आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय 15) याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे सात वाजता आरव क्रिकेट सरावासाठी मैदानावर गेला होता. त्यावेळी क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर काही अल्पवयीन मुलांकडून ओढून घेतला जात होता. याच दरम्यान आरवचा तोल जाऊन तो खाली पडला आणि जड रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थितांनी तातडीने त्याला बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत मुलाचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत आयोजक आणि प्रशिक्षकांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. क्रिकेट मैदानावरील जड रोलर हाताळण्यासाठी प्रशिक्षित किंवा प्रौढ व्यक्ती नेमण्याऐवजी अल्पवयीन मुलांकडूनच हे धोकादायक काम करून घेतले जात होते. अपघाताची शक्यता असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणात मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे तसेच क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देबडवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल न्याय कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बार्शी शहरात शोककळा पसरली असून क्रीडा शिबिरांमधील सुरक्षा उपाययोजना, प्रशिक्षकांची जबाबदारी आणि अल्पवयीन मुलांकडून धोकादायक उपकरणे हाताळून घेण्याच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गलगटे करत असून घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांचे जबाब, सुरक्षा व्यवस्थेची स्थिती आणि फिर्यादीतील आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.