पुणे परिसरात विषारी दारूचा कहर! ११ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मोठी दुर्घटना घडली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात सहा जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील हडपसरजवळील काळेपडळ परिसरात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विषारी स्पिरिटयुक्त दारू सेवन केल्यानंतर संबंधित व्यक्तींना तोंडाला फेस येणे, प्रकृती बिघडणे अशा गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला आणि काहींचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ही केमिकलयुक्त गावठी दारू योगेश वानखेडे याने तयार केल्याचे समोर आले आहे. त्याने ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये विक्रीसाठी पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली असून तो एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर याआधीही २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये केमिकलयुक्त दारू विक्रीचे गुन्हे दाखल झाले होते. तरीदेखील त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्यामुळेच ही गंभीर घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण साखळीचा तपास सुरू असल्याचे सांगितले. “ही घटना अत्यंत गंभीर असून हा एकप्रकारे हत्येचाच प्रकार आहे. आरोपींवर कठोर कलमे लावण्यात येतील,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. विषारी दारूमध्ये मिथेनॉलसारख्या घातक रसायनाचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.