‘उन्नती’च्या माध्यमातून ग्रामीण विकासावर भर देणार – अभिनेता सोनू सूद
अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद यांनी ग्रामीण विकासासाठी
‘उन्नती’ उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
चित्रपटातील यश आणि पुरस्कारांपेक्षा एखाद्या सामान्य माणसासाठी आशेचा किरण
बनण्यात खरे समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या सोनू सूद यांनी
पत्रकार परिषदेत ‘सोनू सूद चॅरिटी फाउंडेशन’ आणि ‘उन्नती’ प्रकल्पाच्या माध्यमातून
सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कोविड काळात स्थलांतरित
मजुरांना मदत करण्यापासून सुरू झालेला सामाजिक प्रवास आता शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासापर्यंत
पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ
तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. या गावात रस्ते, ड्रेनेज, वीज, शौचालये,
आरोग्य आणि शिक्षण सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव
असल्याचे सांगत अनेक ठिकाणी मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची खंत त्यांनी
व्यक्त केली. अशा महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे
आश्वासन त्यांनी दिले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी
‘सोनू सूद चॅरिटी फाउंडेशन’ कार्यरत असल्याचे सांगत, एका मुलाला शिक्षण मिळाल्यास त्याच्या
पुढील पिढ्यांचे भविष्य बदलू शकते, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास पुढील काही वर्षांत
हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकते, असा आशावादही त्यांनी
व्यक्त केला. राजकारणात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट
सांगितले की, सध्या तरी राजकारणात जाण्याचा कोणताही विचार
नाही. अनेक मोठ्या ऑफर्स मिळाल्या असल्या तरी समाजकार्यातून लोकांशी जोडलेले राहणे
अधिक महत्त्वाचे वाटते, असे त्यांनी नमूद केले.
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवरही त्यांनी भाष्य करत शेल्टर होम उभारण्याची गरज व्यक्त केली. या प्रश्नाच्या समाधानासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेस चित्रकार विपुल मिरजकर, रूपल पांडे, मानसी, राहुल बऱ्हाणपूरकर आदी उपस्थित होते.