सोलापुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर; चार ठिकाणांवरील पाडकाम पूर्ण
सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून शहरातील
अनधिकृत बांधकामांविरोधातील विशेष मोहीम सुरू असून आज विविध भागांमध्ये कारवाई
करण्यात आली. सामासिक अंतर (मार्जिन), पार्किंग जागा आणि नियमानुसार खुल्या
ठेवावयाच्या जागांमध्ये उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर ही कारवाई
करण्यात आली.
भवानी पेठ येथील टी.पी. क्र. ०२, अंतिम प्लॉट क्र. ९० एच/३२ मधील श्री. रामकृष्ण मल्लिकार्जुन रंगदाळ व इतर
यांच्या मालकीच्या इमारतीच्या रिअर मार्जिनमध्ये बांधण्यात आलेला अनधिकृत जिना
तसेच संडास-बाथरूमचे बांधकाम हटविण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईसाठी संबंधित
मिळकतदारांनी स्वतः ब्रेकर व मजूर उपलब्ध करून प्रशासनाला सहकार्य केले. याशिवाय
बालाजी नगर येथील श्रीकांत चोपडा आणि सलगरवाडी येथील सय्यद मदनी यांच्या अनधिकृत
गाळ्यांवरही कारवाई करण्यात आली. नेहरू नगरमधील श्री. पलवेचा तसेच विजय देशमुख
नगरमधील श्री. पिरजादे यांच्या सामासिक अंतरातील वाढीव बांधकामे आणि बाल्कनीचे
पाडकाम करण्यात आले. तसेच बोलकोटे नगर येथील श्री. अशोक तांबोळू यांच्या वाढीव
अनधिकृत बांधकामाचेही निष्कासन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान एकूण चार
ठिकाणांवरील प्रमुख अनधिकृत बांधकामांवर कारवाई पूर्ण करण्यात आली.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्या नियंत्रणाखाली पार
पडली. यावेळी उपअभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता इरशाद जरतार, विविध कनिष्ठ अभियंते, अतिक्रमण विभागाचे अधिकारी
तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, शहरातील अनधिकृत बांधकामे, सामासिक अंतरातील
अतिक्रमणे आणि पार्किंग जागांवरील बेकायदेशीर बांधकामांविरोधातील कारवाई पुढेही
सातत्याने सुरू राहणार आहे.