मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर; मराठा आरक्षणासह १० प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची धार वाढवत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (३० मे) पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदान आंदोलनावेळी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. उपोषणापूर्वी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने जरांगे यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, सातारा-कोल्हापूरसह संस्थानांच्या संदर्भात शासन निर्णय काढणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकऱ्या देणे, सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणे, महामंडळाचे थकीत परतावे वाटप करणे, कुणबी प्रमाणपत्रधारकांना व्हॅलिडिटी देणे, मराठा उपसमिती बरखास्त करणे, स्वतंत्र कुणबी व मराठा मंत्रालय स्थापन करणे आणि शिंदे समितीला मुदतवाढ देणे यांचा समावेश आहे.

उपोषणाला सुरुवात करताना मनोज जरांगे म्हणाले, “माझा संघर्ष प्रामाणिक आहे. सरकारं येतील-जातील, पण मी उपोषणावर ठाम आहे. ५८ लाख नोंदीधारकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे. आंदोलन थांबणार नाही.” जरांगे यांनी सरकारला इशारा देताना आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर टाळण्याचे आवाहन केले. तसेच मराठा आरक्षण समर्थक राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन करून या उपोषणाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.