सोलापुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बडगा; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची प्रत्यक्ष पाहणी

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गुरुवारी (29 मे) महत्त्वाची कारवाई करण्यात आली. या कारवाईची प्रत्यक्ष पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन केली. यावेळी नवी पेठ येथील श्री. सुरतवाला यांच्या जागेवरील तसेच शुक्रवार पेठ येथील श्री. जवाहर मोतीलाल शहा यांच्या C.S. No. 3994/क-2 या मालमत्तेवरील अनधिकृत बांधकाम पाडकाम कारवाईची पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, शहरातील नियमबाह्य आणि परवानगीविना उभारण्यात आलेल्या बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या धोरणानुसार अशा सर्व बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही सूट दिली जाणार नाही. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन नियमानुसार कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे. या पाहणीवेळी श्री. निळकंठ मठपती, श्री. आनंद जोशी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सुरू असलेल्या कारवाईची माहिती आयुक्तांना दिली.