मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, वाहतूक काही काळ विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात घडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. खालापूर फूड मॉल परिसरात पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दोन मालवाहू ट्रक एकमेकांवर जोरदार धडकले. त्यानंतर मागून येणारी एक कारही अपघातग्रस्त वाहनांवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की एका ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला, तर दुसऱ्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोघे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताचे ठिकाण मिसिंग लिंकजवळ असल्याने पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काही काळ मिसिंग लिंक मार्ग बंद ठेवून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली.

अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मिसिंग लिंक मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.