आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्यांचा महापालिकेकडून गौरव; महापौरांच्या हस्ते सत्कार

लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणारे त्यांचे नातू सचिन साठे यांचा सोलापूर महानगरपालिकेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. महापौर विनायक दादा कोंडयाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी महापौर विनायक दादा कोंडयाल यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या साहित्याने आणि शाहिरीने समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना आवाज दिल्याचे सांगितले. समाजप्रबोधन आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी नमूद केले. आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सचिन साठे करत असल्याने त्यांचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सत्कार समारंभास भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनोद दादा वाघमारे, मातंग एकता आंदोलन संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष महेश लोंढे, गणेश वाघमारे, अभिषेक पाटोळे, पृथ्वीराज लोंढे, अमित भद्रे, रविंद्र कांबळे तसेच अक्कलकोट तालुका पंचायत समिती सदस्य उत्तम वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव होत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.