आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाला अपघात; जोरहाट हवाई तळावर आपत्कालीन परिस्थिती
आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अडचण निर्माण झाल्यानंतर त्याला आग लागली आणि विमानाचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर हवाई तळावरील अग्निशमन दल व आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भारतीय हवाई दलाने चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान नियमित उड्डाणावर होते. जोरहाट हवाई तळावर लँडिंग करत असताना विमानात स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचे सांगितले जात आहे. विमानातील कर्मचारी आणि जवानांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदनात, “जोरहाट येथे AN-32 विमान अपघातग्रस्त झाले असून अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील जाहीर करण्यात येतील,” असे म्हटले आहे. AN-32 हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात विश्वासार्ह मालवाहू विमानांपैकी एक मानले जाते. हे विमान विशेषतः दुर्गम भाग, हिमालयीन प्रदेश आणि सीमावर्ती क्षेत्रांमध्ये सैनिक, लष्करी साहित्य व मदत सामग्रीच्या वाहतुकीसाठी वापरले जाते. १९८० च्या दशकापासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत असलेले AN-32 विमान उष्ण हवामान, उच्च उंची आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत कार्यक्षमतेने काम करण्यासाठी ओळखले जाते. एका वेळी ४० हून अधिक सैनिक किंवा सुमारे ६.७ टन माल वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. दरम्यान, या अपघातामुळे संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून भारतीय हवाई दलाच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.