वादग्रस्त वक्तव्यांनंतर प्रणित मोरेची जाहीर माफी; "माझी मोठी चूक झाली, मला एक संधी द्या"
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका वादग्रस्त
प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधील काही
व्यक्तींनी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठा
वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतल्याची
चर्चा आहे.
या प्रकरणामुळे प्रणित मोरे याच्यावरही टीकेची झोड उठली होती. सोशल मीडियावर वाढत्या टीकेनंतर अखेर त्याने व्हिडिओ संदेशाद्वारे सार्वजनिक माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये बोलताना प्रणित मोरे म्हणाला की, संबंधित व्हायरल व्हिडिओबाबत आपली भूमिका आधी मांडायची होती, मात्र सोशल मीडिया खाते निलंबित झाल्याने ते शक्य झाले नाही. "या प्रकरणामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील याची मला जाणीव आहे. त्या क्षणी मी योग्य भूमिका घेऊ शकलो नाही, ही माझी मोठी चूक होती," अशी कबुली त्याने दिली. त्याने पुढे सांगितले की, कार्यक्रमादरम्यान संबंधित व्यक्तीने केलेल्या वक्तव्यांवर तो त्याचवेळी आक्षेप घेऊ शकला असता किंवा ती चर्चा थांबवू शकला असता. मात्र तसे न झाल्यामुळे त्या व्यक्तीला एक व्यासपीठ मिळाले आणि वाद अधिक वाढला. "ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. माझ्याविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत मी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहे," असेही त्याने स्पष्ट केले. यावेळी त्याने प्रेक्षक आणि चाहत्यांना आवाहन करत, "मला एक संधी द्या. या घटनेतून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. भविष्यात अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करेन," असे म्हटले. या संपूर्ण घटनेमुळे स्टँड-अप कॉमेडीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोदाच्या मर्यादा आणि सामाजिक जबाबदारी याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.