शेअर मार्केटमधील १.८० कोटींच्या कर्जातून मुख्याध्यापकाचे टोकाचे पाऊल; पत्नी व दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एक
हृदयद्रावक घटना घडली आहे. शेअर मार्केटमधील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आणि
वाढत्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून मुख्याध्यापक योगेश बाळासाहेब पाटील यांनी
पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, योगेश पाटील (वय ४१) हे नंदुरबार
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शेअर
मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांच्यावर सुमारे १ कोटी ८० लाख
रुपयांचे कर्ज झाले होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेस्थळी पोलिसांना २२ पानांची सविस्तर चिठ्ठी आढळून आली
आहे. या चिठ्ठीत त्यांनी शेअर मार्केटमधील व्यवहार, झालेला नफा-तोटा, नातेवाईकांकडून
घेतलेले कर्ज आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, योगेश पाटील यांनी पत्नी माधुरी पाटील आणि मुलगे अथर्व व शिवांश यांना विष दिल्यानंतर स्वतःही विष प्राशन केले आणि गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे बार्शी तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत असून मृत्यूमागील सर्व कारणांचा सखोल तपास सुरू आहे.