शेतकऱ्यांवर पहिला हक्क राज्याच्या तिजोरीचा; मदतीच्या नावाखाली दिखावा थांबवा – विजय वडेट्टीवार

राज्यातील शेतकरी प्रश्नांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले असून न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात मात्र आघाडीवर असल्याची टीका त्यांनी केली.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम हक्क शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे अन्नदात्याला मदत करायची असेल तर ती सन्मानाने आणि प्रभावीपणे द्यावी, केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याने स्वतः नांगर ओढून शेती केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सरकारने संबंधित दांपत्याला एक बैल दिला. मात्र या मदतीचे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीकरण करण्यात आले. दिलेला बैल आजारी निघाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर उपचारांचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

सरकार शेतकऱ्यांना शाश्वत आणि परिणामकारक मदत देण्याऐवजी जाहिरातबाजी आणि फोटोसेशनवर भर देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही घटना सरकारच्या शेतकरी धोरणाचे वास्तव चित्र दाखवते, असेही ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसून उर्वरित कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष दिलासा देणाऱ्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.