भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग 'भगवा' का? हॉकी इंडियाने दिले तांत्रिक स्पष्टीकरण

२०२६ च्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघासाठी नव्या भगव्या रंगाच्या जर्सीची घोषणा करण्यात आली. पारंपारिक निळ्या जर्सीऐवजी भगवा रंग स्वीकारल्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाने अधिकृत निवेदन जारी करत हा निर्णय कोणत्याही अन्य कारणासाठी नसून पूर्णपणे तांत्रिक असल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने सध्या निळ्या रंगाच्या सिंथेटिक टर्फवर खेळवले जात असल्याने निळ्या जर्सीतील खेळाडू सहज ओळखणे कठीण होत होते. त्यामुळे मैदानावरील दृश्यमानता सुधारण्यासाठी भगव्या रंगाची निवड करण्यात आल्याचे संस्थेने सांगितले. हॉकी इंडियाच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या सल्ल्यानंतर घेण्यात आला आहे. जर्सीसाठी पिवळा आणि भगवा या दोन रंगांचा विचार करण्यात आला होता. अखेरीस भगवा रंग राष्ट्रध्वजाचा भाग असून शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असल्याने त्याची निवड करण्यात आली.

दरम्यान, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वीरेन रस्कीना यांनी पारंपारिक निळ्या जर्सीच्या बदलावर प्रश्न उपस्थित करत भारतीय हॉकीची ओळख कायम ठेवण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यांच्या प्रतिक्रियेचे राजकीयकरण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. हॉकी इंडियाने यापूर्वीही २०१४ मध्ये पिवळी आणि २०१८ मध्ये आकाशी निळ्या रंगाची जर्सी वापरण्यात आल्याची आठवण करून देत, गरजेनुसार जर्सीच्या रंगात बदल करणे ही नवीन बाब नसल्याचे स्पष्ट केले आहे.