भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाविरोधात नगरसेवक बिज्जु प्रधाने आक्रमक; विशेष मोहीम, नसबंदी व नियंत्रण कक्षाची मागणी
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ०५ सह विविध भागांमध्ये भटक्या
कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत
असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बिज्जु संगप्पा
प्रधाने यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना सविस्तर
निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे शहरभर व्यापक नसबंदी मोहीम, रेबीज
प्रतिबंधक लसीकरण आणि प्रभावी नियंत्रण उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी
करण्यात आली आहे. यावेळी मदन क्षीरसागर, नितीन देशमुख,
अदिनाथ कवडे, प्रशांत चव्हाण, विजय तांबे, गुरुनाथ चराटे यांच्यासह स्थानिक नागरिक
उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिकेने यापूर्वी प्राणी जन्म नियंत्रण (ABC)
मोहीम राबविली होती. मात्र, सध्या प्रभाग
क्रमांक ०५सह शहरातील बहुतांश भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या
प्रमाणात वाढली असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते,
सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, शाळा, अंगणवाड्या, रुग्णालय
परिसर, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे
टोळके मुक्तपणे फिरत असल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला
आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी कुत्र्यांकडून नागरिकांवर धावून जाणे, पाठलाग करणे आणि हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने शहरात भीतीचे
वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भवानी पेठ येथील घोंगडे
वस्तीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा झालेला मृत्यूही
निवेदनात अधोरेखित करण्यात आला असून, अशा घटना पुन्हा घडू
नयेत यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांशी
बोलताना नगरसेवक बिज्जु प्रधाने यांनी सांगितले की, आमदार
देवेंद्र कोठे यांच्या सूचनेनुसार शहरभर विशेष भटक्या कुत्रा नियंत्रण मोहीम
राबविणे, वैज्ञानिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नसबंदी करणे,
सर्व भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे, नागरिकांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू करणे, शाळा, अंगणवाड्या, रुग्णालये
आणि गर्दीच्या परिसरात विशेष मोहीम राबविणे, तक्रारींवर
तात्काळ पथके पाठविणे, पशुवैद्यकीय विभागामार्फत कालबद्ध
कृती आराखडा जाहीर करणे, जनजागृती मोहीम राबविणे तसेच
संपूर्ण मोहिमेचा नियमित सार्वजनिक आढावा प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. शहरातील
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे
सांगत, या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रभावी
कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही नगरसेवक बिज्जु
प्रधाने यांनी व्यक्त केली.