फूड डिलिव्हरी क्षेत्रात Flipkartची दमदार एन्ट्री; Swiggy, Zomato आणि Rapidoसमोर वाढणार स्पर्धा
भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात स्पर्धा आणखी तीव्र होण्याची
चिन्हे दिसत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी Flipkart लवकरच
फूड डिलिव्हरी व्यवसायात प्रवेश करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
सुरुवातीला ही सेवा निवडक शहरांमध्ये आणि मर्यादित ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली
जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर विस्तार केला
जाणार आहे. सध्या भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी बाजारात Swiggy आणि Zomato यांचे वर्चस्व आहे. अलीकडेच Rapido
नेही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत Flipkartच्या आगमनामुळे ग्राहकांसाठी अधिक पर्याय, स्पर्धात्मक
दर आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Flipkart Groupचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले की,
कंपनीची फूड डिलिव्हरी सेवा पुढील काही आठवड्यांत सुरू होईल. मात्र,
या प्लॅटफॉर्मचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या सेवेसाठी
स्वतंत्र मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले जाणार असून Flipkartच्या
मुख्य अॅपमध्येही ही सुविधा समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे विद्यमान Flipkart
ग्राहकांना स्वतंत्र नोंदणीशिवाय सेवा वापरणे अधिक सोयीचे होणार
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Flipkart आपल्या नव्या फूड डिलिव्हरी सेवेचा ONDC
(Open Network for Digital Commerce) नेटवर्कशी समन्वय
साधण्याचाही विचार करत आहे. त्यामुळे अधिक रेस्टॉरंट्स आणि डिलिव्हरी भागीदार
ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतात. मात्र, याबाबत कंपनीने अद्याप
अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही. Flipkartच्या Flipkart
Minutes या क्विक कॉमर्स सेवेच्या यशामुळे कंपनीला फूड
डिलिव्हरी क्षेत्रात उतरायचा आत्मविश्वास मिळाल्याचे मानले जात आहे. कंपनीने दोन
वर्षांपेक्षा कमी कालावधीत देशातील 130 शहरांमध्ये 1,000
हून अधिक मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्सचे जाळे उभारले असून जलद
वितरणासाठी आवश्यक असलेली मजबूत लॉजिस्टिक्स व्यवस्था तयार केली आहे. कंपनीच्या
माहितीनुसार, टियर-2 आणि टियर-3
शहरांमध्ये Flipkart Minutesच्या मागणीत
गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 42 पट वाढ झाली आहे. या
सेवेतील 40 टक्क्यांहून अधिक ग्राहक Gen Z म्हणजेच तरुण वर्गातील असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात Rapidoने Ownly
ही सेवा सुरू करत रेस्टॉरंटकडून कमिशन न घेण्याचा दावा केला आहे.
तसेच Swiggyने कमी बजेटमधील ग्राहकांसाठी Toing
ही नवीन सेवा सुरू केली आहे. Flipkartने
अद्याप आपल्या फूड डिलिव्हरी सेवेचे दर, ऑफर्स किंवा व्यवसाय
मॉडेल जाहीर केलेले नसले तरी कंपनीच्या मजबूत लॉजिस्टिक्स नेटवर्क, मोठ्या ग्राहकवर्ग आणि ई-कॉमर्समधील अनुभवामुळे फूड डिलिव्हरी बाजारातील
स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.