E20 जनता पार्टी म्हणजे काय? इथेनॉल-मिश्रित पेट्रोलविरोधातील डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर "E20 जनता पार्टी" हे नाव वेगाने चर्चेत आले आहे. मात्र, ही कोणतीही नोंदणीकृत राजकीय संघटना किंवा निवडणूक लढवणारा पक्ष नसून, E20 (20 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल) संदर्भातील धोरणावर प्रश्न उपस्थित करणारी एक डिजिटल नागरिक मोहीम असल्याचे संबंधित सोशल मीडिया हँडलवर नमूद करण्यात आले आहे. ही मोहीम X (पूर्वीचे Twitter) आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू असून, स्वतःला सामान्य वाहनचालकांचा आवाज म्हणून सादर करते. या मोहिमेची प्रमुख मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100 टक्के इथेनॉल-मुक्त (Pure Petrol) पर्यायही उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचा पर्याय मिळेल. या मोहिमेच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, वाहन उत्पादकांनी शिफारस केलेल्या इंधनानुसार ग्राहकांना पर्याय उपलब्ध व्हावा. ते E20 इंधनावर बंदी घालण्याची मागणी करत नसून, ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी त्यांची भूमिका आहे.

मोहीमेच्या प्रमुख मागण्या

  • प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबत 100% इथेनॉल-मुक्त पेट्रोल उपलब्ध करावे.
  • वाहन उत्पादकांच्या शिफारशीनुसार इंधनाचा पर्याय उपलब्ध असावा.
  • ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचे इंधन धोरण सक्तीने लागू करू नये.
  • वाहनधारकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा.

या सोशल मीडिया हँडलवरील माहितीनुसार, ही मोहीम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, ग्राहकांचे हक्क, इंधन धोरणातील पारदर्शकता आणि सार्वजनिक चर्चेला चालना देणे हा तिचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या मोहिमेची तुलना यापूर्वी चर्चेत आलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) या डिजिटल मोहिमेशी केली जात आहे. मात्र, E20 जनता पार्टीच्या हँडलने कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर वाढता प्रतिसाद

E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळत आहे. X आणि Instagram या दोन्ही प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत असून, इंधन धोरणावरील चर्चेला या मोहिमेमुळे नवे व्यासपीठ मिळत असल्याचे दिसून येत आहे.