मुळेगाव गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद; पिस्तूल, कोयता आणि दुचाकी जप्त, सर्व ८ आरोपी अटकेत

हैदराबाद रस्त्यावरील मुळेगाव येथे इर्टिगा कारवर गोळीबार करून चालकाकडील अडीच लाख रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर गुन्ह्यातील सर्व आठ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत दत्तात्रय गाडेकर (रा. उळेवाडी), अंकुश दशरथ गायकवाड, महादेव गुरूनाथ विभुते, सुफियान शब्बीर मुल्ला, निखील मल्लिनाथ पटणे उर्फ गोट्या आणि साजीद सलाम पटेल (सर्व रा. बोरामणी) यांच्यासह एकूण आठ आरोपींचा समावेश आहे.

असा घडला होता गोळीबार १५ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी (वय ३७, रा. कर्णिकनगर) हा दिवसभराची कलेक्शन रक्कम कंपनीच्या मालकाच्या घरी घेऊन जात होता. त्यावेळी पांढऱ्या इर्टिगा कारमधून आलेल्या तिघांनी त्याला अडवले. त्यापैकी एका आरोपीने चालकाला ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. गोळीचे छर्रे चालकाच्या छातीच्या उजव्या बाजूस लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर अडीच लाख रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी चालक एजाज तांबोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात तपास पथकांची मोहीम घटनेनंतर तालुका पोलिसांनी सात विशेष तपास पथके तयार केली. अवघ्या २४ तासांत चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून आणखी चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आणि त्यांनाही अटक करण्यात आली. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार जंगलात लपला होता

गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बोरामणी परिसरातील जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडून गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल, कोयता तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहायक फौजदार विवेक सांजेकर तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.