“मोदीजी, बघा तुमच्या NTA ने पुन्हा काय केलं?”; UGC-NET गोंधळावरून राहुल गांधींची टीका

UGC-NET जून २०२६ परीक्षेच्या गोंधळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA वर निशाणा साधला आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांनी अनेक महिने मेहनत घेऊन परीक्षा दिली, शुल्क भरले आणि परीक्षा केंद्रांपर्यंत प्रवास केला. मात्र NTAच्या चुकीमुळे आता त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

त्यांनी प्रश्नपत्रिकांमध्ये चुकीचे प्रश्न आणि जुने प्रश्न पुन्हा विचारल्याचा दावा करत, या चुकीची किंमत विद्यार्थ्यांना का मोजावी लागत आहे, असा सवाल केला. तसेच या प्रकरणात परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या का, याचे उत्तर NTAने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत NTAच्या वरिष्ठ नेतृत्वालाही जबाबदार धरले पाहिजे, असे म्हटले आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात कोणताही दोष नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले. UGC-NET प्रकरणावरून आता केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.