अक्कलकोटमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; ऊसाच्या शेतातून 1 कोटी 5 लाखांचा गांजा जप्त
अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या
विशेष मोहिमेअंतर्गत अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मोठी कारवाई केली. आळगी
(ता. अक्कलकोट) येथील एका ऊसाच्या शेतात गांजासदृश वनस्पतींची लागवड केल्याची
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 211 किलो 100 ग्रॅम
वजनाचा गांजा जप्त केला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 1 कोटी 5 लाख 55 हजार रुपये असल्याचे
पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार
(वय 60, रा. शेगाव, ता.
अक्कलकोट, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
28 सप्टेंबर 2026 रोजी
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व त्यांचे पथक
करजगी दुरक्षेत्र परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आळगी येथील एका शेतात ऊसाच्या
पिकामध्ये गांजासदृश वनस्पतींची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या
आधारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पथकासह
संबंधित शेतात कारवाई केली.
ऊसाच्या शेतात 240 गांजाची झाडे
पोलिसांनी शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये
ठिकठिकाणी अंदाजे 12 फूट उंचीची गांजासदृश झाडे आढळून
आल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचनाम्याअंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण 240 झाडे आढळली. त्यापैकी 210 झाडे जिवंत, तर 30 झाडे वाळलेली असल्याचे
पोलिसांनी नमूद केले आहे. या वनस्पतींचे एकूण वजन 211 किलो 100
ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले.
NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल
जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹1,05,55,000 असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक 531/2026 नुसार अंमली पदार्थ व
मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे
करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस
अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात
आली.