दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन, जनावरे दगावली, विहीर आटली; कर्जाच्या विवंचनेत 18 वर्षीय प्रथमेशने जीवन संपवले

सोलापूर : दोन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन, त्यानंतर शेतीची जबाबदारी, जनावरांचा मृत्यू, विहिरीतील पाणी आटणे आणि कर्जाचे वाढते ओझे अशा संकटांना सामोरे जाणाऱ्या 18 वर्षीय तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे सोमवारी, 28 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव प्रथमेश अनिल खरात (वय 18) असे आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच खरात कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

शेतात आढळला प्रथमेश

28 सप्टेंबरच्या रात्री प्रथमेश शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन

प्रथमेशच्या वडिलांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी बैलगाडीच्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी प्रथमेशवर आली होती. दरम्यान, मागील काही दिवसांत त्याच्या दोन जर्सी गायी सर्पदंशामुळे दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच परिसरातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतीसाठी पाण्याची अडचण यामुळे तो आर्थिक संकटात असल्याचे सांगितले जात आहे.

कर्जाच्या ओझ्यामुळे कुटुंबावर संकट

शेतीतील अडचणी, जनावरांचे नुकसान आणि वाढत्या कर्जामुळे प्रथमेश विवंचनेत असल्याची माहिती कुटुंबीय व परिसरातून समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 18व्या वर्षी शेतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रथमेशच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रथमेशच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच बीबीदारफळ गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अवघ्या 18व्या वर्षी प्रथमेशचा मृत्यू झाल्याने खरात कुटुंबासह संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.