यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला भीषण आग; 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर पोलीस ठाण्याच्या
हद्दीत यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. दयानतपूर
गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी असल्याची प्राथमिक
माहिती आहे. या दुर्घटनेत ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती
नोएडा पोलिसांनी दिली आहे. काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या
बसला अचानक आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने संपूर्ण
बसला वेढले. आग लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर अनेक
प्रवाशांनी बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी बसमधून
उड्या मारल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आग वेगाने
पसरल्यामुळे काही प्रवासी बसमध्येच अडकले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती
आहे.
वृद्ध महिला आणि दिव्यांग मुलाचाही मृतांमध्ये समावेश
या दुर्घटनेतील मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एका
दिव्यांग मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना कैलास
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस, एक्सप्रेसवे सुरक्षा पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. चार ते
पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमुळे
जेवर टोल आणि फलायदा क्रॉसिंगजवळ काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती. आग
नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
प्रत्यक्षदर्शींनी बसमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि
आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे सांगितले. काही प्रवाशांनी बसमधून फटाके
फुटल्यासारखा आवाज ऐकू आल्याचेही सांगितले आहे. मात्र, बसला नेमकी आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट
झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून आगीचे
नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून दखल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या
दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला
असून जखमींना योग्य आणि तातडीचे उपचार मिळावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी
केल्या आहेत.