राजकारणापलीकडची अमोल शिंदे-चेतन नरोटे यांची मैत्री; नाती जपल्याचा आनंद – खासदार प्रणिती शिंदे

सोलापूरातील वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळाच्या लेझीम सरावाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांच्या मैत्रीचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. यावेळी अमोल शिंदे आणि चेतन नरोटे हे दोघेही एकत्र उपस्थित होते.

“मैत्री राजकारणापलीकडची”

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अमोल बापू आणि चेतन भाऊ यांची मैत्री ही राजकारणापलीकडची आहे. त्यांनी आजही नाती जपली आहेत, याचा आनंद आहे. दोघेही सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांत सक्रिय असले तरी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पिसे महाराजांच्या तालमीत दोघांची जडणघडण

अमोल शिंदे आणि चेतन नरोटे हे दोघेही पिसे महाराजांच्या तालमीत तयार झालेले आहेत. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांनी आपली मैत्री आणि सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे. आजच्या काळात हे कौतुकास्पद असल्याचेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांची मोठी उपस्थिती

लेझीम सरावाच्या उद्घाटन सोहळ्याला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नवरात्रोत्सवाच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली.