जावयाचा आई-वडिलांना फोन अन् काही तासांतच वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू; पुण्यात खळबळ

पुणे : नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पुण्यातील उंड्री परिसरात २३ वर्षीय वैष्णवी जरांडे या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी बंगळुरू येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती. तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे.

लग्नाला चारच महिने; ४५ लाखांचा खर्च आणि १० तोळे सोने

वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. मुलीच्या लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च केल्याचे तसेच १० तोळे सोने दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मात्र, त्यानंतर नवीन कार खरेदी करण्यासाठी माहेरहून आणखी ५ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या मागणीवरून वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.

रात्री आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास

२४ सप्टेंबरच्या रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन केला. यावेळी तिने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाबद्दल रडत रडत माहिती दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास वैष्णवीच्या पतीने तिच्या माहेरी फोन केल्याचे सांगण्यात येते. “तुमच्या मुलीला ताबडतोब घरी घेऊन जा, नाहीतर माझ्या हातून काहीतरी बरेवाईट घडेल,” अशी धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

माहेरचे लोक पुण्यात पोहोचले; घरात आढळला मृतदेह

पतीचा फोन आल्यानंतर वैष्णवीचे आई-वडील रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पहाटे उंड्री येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांना वैष्णवीचा मृतदेह आढळला.

सासरच्यांकडून वैष्णवीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा आत्महत्येचा प्रकार नसून वैष्णवीचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

सासरच्यांविरोधात गुन्हा; पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण, हुंड्यासाठी छळ झाला होता का आणि वैष्णवीच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.