तीन वर्षांपूर्वीची चोरी उघड; 11 लाखांचे सोने जप्त, शेजाऱ्यानेच मारला होता डल्ला

सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मुमताज नगरमधील घरातून सोन्याची चोरी मुमताज नगर येथील प्लॉट क्रमांक २ मधील एका घरात २७ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरातील कपाटाच्या लॉकरमधून सुमारे ९६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा शोएब रमजान शेख (वय २६, रा. मुमताज नगर, सोलापूर) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

चौकशीत चोरीची कबुली; संपूर्ण सोने जप्त

पोलिसांनी बुधवारी शोएब शेख याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले ९ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे, जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, फौजदार मनोज मोरे तसेच पोलीस अंमलदार बापू साठे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, युवराज गायकवाड, प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी सहभाग घेतला.