अबब! मुंबई गणेशोत्सवात भाविकांना चप्पल-बुटांचा विसर; तब्बल ८ टन पादत्राणे जमा
मुंबई : गणेशोत्सवाच्या गर्दीत चप्पल-बुटांचा विसर
गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात गणेशदर्शनासाठी मोठी
गर्दी झाली होती. या गर्दीत दर्शनासाठी पादत्राणे काढल्यानंतर अनेक भाविकांना आपली
चप्पल, बूट, स्लीपर आणि सँडल पुन्हा घेण्याचा विसर पडला. मुंबई
महापालिकेच्या एफ दक्षिण विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ग्रीन
सोल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने या परिसरातून तब्बल ८ मेट्रिक टन
पादत्राणे जमा करण्यात आली आहेत.
पहिल्याच दिवशी ४ टन पादत्राणे जमा
परळ वर्कशॉप, आयटीसी हॉटेल, भारतमाता,
चिंचपोकळी आणि बकरी अड्डा या मार्गांवर गणेशोत्सवाच्या काळात मोठी
गर्दी झाली होती. गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे काही भाविकांनी दर्शनासाठी काढलेली
पादत्राणे तेथेच सोडली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला एका दिवसात सुमारे ४ मेट्रिक
टन चप्पल, स्लीपर, बूट आणि सँडल जमा करण्यात आली. त्यानंतर पुढील १२ दिवसांत या पादत्राणांचे प्रमाण
वाढून तब्बल ८ टनांवर पोहोचले.
पुनर्प्रक्रिया करून गरजूंपर्यंत पोहोचणार
जमा झालेल्या पादत्राणांवर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार
आहे. त्यानंतर ही पादत्राणे गरजू मुले-मुली तसेच आदिवासी भागातील नागरिकांना
देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात
निर्माण झालेल्या या कचऱ्याचा पुनर्वापर होण्यासोबतच गरजू नागरिकांनाही त्याचा
उपयोग होणार आहे.
विसर्जनानंतर २,७५४.८५ टन साहित्य जमा
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती
विसर्जनानंतर निर्माण झालेल्या अवशेषांसह अन्य साहित्याच्या संकलनासाठी मुंबई
महापालिकेने विशेष कार्यवाही केली. १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान एकूण २,७५४.८५ मेट्रिक टन साहित्य संकलित करण्यात आले.
हे साहित्य ७०७ वाहनफेऱ्यांद्वारे तात्पुरत्या साठवणूक केंद्रापर्यंत
नेण्यात आले.
अनंत चतुर्दशीला सर्वाधिक वाहतूक
२६ सप्टेंबर अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वाधिक
साहित्याची वाहतूक झाली. या दिवशी १३१ वाहनफेऱ्यांमधून ५१०.९२ मेट्रिक टन
साहित्य तात्पुरत्या साठवणूक केंद्रात नेण्यात आले. विसर्जनानंतर
जलस्रोतांमध्ये पीओपीच्या मूर्तींचे अवशेष राहू नयेत, यासाठी हे साहित्य संकलित करण्यात आले. यासाठी न्यायालयीन निर्देश आणि
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिफारशींचे पालन करण्यात आल्याचे सांगण्यात
आले.
के-पश्चिम विभागातून सर्वाधिक साहित्य
विभागनिहाय संकलनात के-पश्चिम विभागातून ३१४.८२
मेट्रिक टन साहित्य जमा झाले. त्यानंतर एस विभागातून २५३.५८ मेट्रिक टन, तर डी विभागातून २४९.४३ मेट्रिक टन साहित्य संकलित करण्यात आले. विसर्जनानंतर
जमा झालेले मूर्ती साहित्य मुलुंड येथील निर्धारित तात्पुरत्या साठवणूक
केंद्रात नेण्यात आले आहे. पुढील टप्प्यात या साहित्याचा पर्यावरणपूरक
पद्धतीने पुनर्वापर, पुनर्चक्रण किंवा पुनर्प्रक्रिया
करण्यात येणार आहे.