प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक; अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना जुजबी
मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला आहे.
चालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या
कालावधीत मराठी येत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार
नाही. यापूर्वी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी
चालकांना नोटीस दिल्यानंतर एका महिन्याच्या आत जुजबी मराठी शिकण्याची मुदत दिली
होती. मराठी बोलता न आल्यास पुढील कारवाईची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, रिक्षा
आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
कमी कालावधीत मराठी शिकणे अनेक चालकांना कठीण जात असल्याने अधिक वेळ देण्याची
मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करत फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
केली.
'महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकणे
आवश्यक'
महाराष्ट्रात राहायचे आणि येथे व्यवसाय करायचा असेल तर जुजबी मराठी
शिकणे आवश्यक आहे, ही भूमिका कायम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी
स्पष्ट केले. विविध वयोगटातील रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी शिकण्याचा प्रयत्न करत
आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या एका
वर्षाच्या कालावधीत चालकांनी जुजबी मराठी शिकावी, अशी
अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाने जुजबी मराठी शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. मात्र, मुख्यमंत्री हे सरकारमधील सर्वोच्च नेते असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठी बंधनकारक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परिवहन विभागाने यापूर्वी दिलेल्या एक महिन्याच्या मुदतीऐवजी आता चालकांना एक वर्षाचा अवधी मिळणार आहे. या निर्णयामुळे महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकांबाबत राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.