अजित दादांची थीम असलेली वावडी उडवताना तरुणही हवेत उडाला; २५ ते ३० फूट उंचीवर पोहोचला, Video व्हायरल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे दरवर्षी पारंपरिक वावडी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवात वावडी उडवताना एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली. मोठी वावडी उडवत असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दोरी पकडलेला एक तरुण चक्क हवेत उडाला. निमगाव येथे होणाऱ्या या वावडी महोत्सवात पाच फुटांपासून तब्बल ३० फुटांपर्यंतच्या वावड्या उडवल्या जातात. मोठ्या वावड्या हवेत उडवण्यासाठी अनेक जण मिळून प्रयत्न करतात. यंदाही गावाबाहेरील माळरानावर वावडी उडवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अजित पवारांच्या थीमची वावडी चर्चेत

यंदाच्या महोत्सवात गावातील महाराज प्रतिष्ठानकडून दिवंगत अजित पवार यांच्या थीमची वावडी तयार करण्यात आली होती. या वावडीवर दादा तुम्ही दूर गेलात, पण मनातून कधीच नाही... We Miss You Dada’ आणि लोकनेते अजित दादा अमर रहे’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. ही सुमारे २० फुटांची वावडी दोरीच्या सहाय्याने हवेत उडवली जात असताना अचानक वाऱ्याचा जोर वाढला. त्यामुळे वावडीची दोरी पकडलेल्या एका कार्यकर्त्याचे संतुलन बिघडले आणि तो थेट हवेत खेचला गेला.

२५ ते ३० फूट हवेत उडाला तरुण

वाऱ्याच्या जोरामुळे संबंधित तरुण तब्बल २५ ते ३० फूट उंचीपर्यंत हवेत गेला. काही काळ तो वावडीसोबतच हवेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर वाऱ्याचा वेग कमी झाल्याने आणि इतर कार्यकर्त्यांनी दोरी सैल केल्याने वावडी खाली आली. त्यावेळी तरुणाने खाली उडी मारली. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, वावडी महोत्सवातील या अनोख्या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.