मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी पायाने ‘आई’ची मॅरेथॉनमध्ये धाव! रमाबाईंनी पटकावला प्रथम क्रमांक
अंबाजोगाई : मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल
भविष्यासाठी एका आईने घेतलेला संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बीड
जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी चक्क अनवाणी पायाने
मॅरेथॉनमध्ये धावत प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या
खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी छत्रपती
शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक या मार्गावर ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रमाबाईंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्या साडी नेसून स्पर्धेत धावल्या आणि अखेर प्रथम क्रमांक मिळवत ३ हजार
रुपयांचे बक्षीस पटकावले.
स्लीपर निसटली अन् अनवाणी धाव सुरू
मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर अनेक तरुण-तरुणी सुरुवातीला
रमाबाईंच्या पुढे निघून गेले. मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्यांच्या पायातील
स्लीपर निसटू लागली. वेग कमी करण्याऐवजी रमाबाईंनी स्लीपर हातात घेतली आणि अनवाणी
पायाने धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक-एक स्पर्धकाला मागे टाकत
अखेर प्रथम क्रमांक मिळवला. रमाबाईंकडे कोणतेही विशेष धावण्याचे प्रशिक्षण नव्हते.
तसेच मॅरेथॉनसाठी महागडे स्पोर्ट्स शूजही नव्हते. केवळ इच्छाशक्ती, जिद्द आणि मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा या जोरावर
त्यांनी ही स्पर्धा जिंकली.
पतीच्या निधनानंतर मुलींची जबाबदारी खांद्यावर
रमाबाईंच्या पतीचे निधन झाले असून, दोन्ही मुलींना शिकवून त्यांना मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मुलींच्या शिक्षणासाठी रमाबाई मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाई येथे वास्तव्यास आल्या. येथे त्या स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती कठीण असली तरी मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करण्याची त्यांची जिद्द कायम आहे. मॅरेथॉनमधील विजयातूनही त्यांनी ‘कितीही अडचणी आल्या तरी मुलींच्या भविष्यासाठी मागे हटणार नाही’ असा संदेश दिला.
रमाबाईंच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक
अनवाणी पायाने धावत मॅरेथॉन जिंकणाऱ्या रमाबाईंच्या
कामगिरीचे उपस्थितांकडून आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या संघर्षाची आणि
जिद्दीची ही कहाणी केवळ महिलांसाठीच नव्हे, तर तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी आईची ही धाव म्हणजे केवळ मॅरेथॉनमधील विजय नसून, संघर्षावर मात करून स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीचा विजय ठरला आहे.