‘एकता महिला मंच’चा स्तुत्य उपक्रम; सलगर वस्ती पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरे
सोलापूर : नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एकता महिला
मंच’च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे, सोलापूर
येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला पोलीस
कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता
या उपक्रमावेळी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
श्रीशैल्य गजा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांच्यासह
पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकारी
आणि सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्याप्रती कृतज्ञता
व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस ठाण्यात स्नेहपूर्ण वातावरण निर्माण
झाले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आपल्या
कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सन्मान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पोलिसांकडून महिलांना रोपांची भेट
राखी बांधल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
वतीने उपस्थित महिला भगिनींना वृक्षारोपणाचा संदेश देत प्रत्येकी एक झाडाचे रोप
भेट देण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीसोबत पर्यावरण
संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.
‘एकता महिला मंच’च्या सामाजिक कार्याची
माहिती
कार्यक्रमादरम्यान ‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर
क्षीरसागर यांनी उपक्रमामागील भूमिका आणि मंचच्या सामाजिक कार्याची माहिती
दिली. सोलापूर जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी यांनीही मंचच्या विविध सामाजिक
उपक्रमांची माहिती देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षकांनी केले उपक्रमाचे कौतुक
पोलीस निरीक्षक श्रीशैल्य गजा यांनी ‘एकता महिला
मंच’च्या उपक्रमाचे कौतुक केले. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलिसांना कामाच्या
व्यस्ततेमुळे गावी जाता येत नसल्याचे सांगत, महिला स्वतः पोलीस ठाण्यात येऊन राखी
बांधल्याने मनापासून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सायबर गुन्ह्यांबाबत महिलांना मार्गदर्शन
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांनी
उपस्थित महिलांचे आभार मानत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी
वाढत्या सोशल मीडिया आणि सायबर गुन्ह्यांबाबतही महिलांना मार्गदर्शन केले.
सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाला पोलीस कॉन्स्टेबल दिलीप विधाते, सागर सुरवसे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मी सुतार, जिल्हा
प्रवक्त्या रंजना गवळी यांच्यासह डोणगाव येथील पदाधिकारी व सदस्य सावित्री
पाटील, प्रीती येरनाळे, संजीवनी
शेळके, रेखा शेळके, कविता देशेट्टी,
सुवर्णा गायकवाड, राणी दगडे, सुरेखा शेळके, नीलगंगा यरनाळे, सोनाली येरनाळे, दुर्गा चौगुले, रंजना आसबे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या. पोलीस आणि समाजातील स्नेहाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमातून ‘रक्षण करणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता’ आणि ‘पर्यावरण संवर्धन’ असा दुहेरी संदेश देण्यात आला.