मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

वडीगोद्री : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत वडीगोद्री फाट्यासमोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या देत सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच जेवणाची पंगत मांडली, तर काही आंदोलक चिवडा खात ठिय्या देताना दिसून आले. रास्ता रोकोदरम्यान हलगीच्या तालावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सरकारने जरांगे यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, चर्चेत ठोस तोडगा निघाला नसल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. रास्ता रोकोमुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांकडून आंदोलकांशी संवाद साधून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जरांगे यांच्या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.