पांढऱ्या द्रवाचा अंश अन् उग्र वास; पती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू, कदम कुटुंबावर शोककळा
सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात पती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद
मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवारी
राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा
मंगळवारी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनी
विषारी औषध प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घरगुती वादातून
हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात
असला तरी अधिकृत कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घरगुती वादाचा संशय
बाळासाहेब कदम आणि त्यांच्या पत्नी उषा हे दोघे पलूस येथे राहत होते.
३० ऑगस्ट रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला असावा. त्यानंतर उषा कदम
यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांना पलूस
ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उषा यांची प्रकृती गंभीर होत
असल्याचे लक्षात आल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी बाळासाहेब कदम यांनीही विषारी औषध प्राशन
केल्याचा संशय आहे.
पतीचा राहत्या घरी मृत्यू
बाळासाहेब कदम हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आणि त्यांच्या तोंडातून
फेस येत असल्याचे त्यांचा मुलगा अजय कदम यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर
नातेवाईकांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी
त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, उषा कदम यांची प्रकृतीही
गंभीर होती. त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात
आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू
झाला.
मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार
बाळासाहेब कदम यांच्या मृत्यूच्या ठिकाणी पांढऱ्या द्रवाचा अंश आणि
उग्र वास आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उषा कदम यांनी विषारी औषध घेतल्याचा
संशय असल्याने दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दोघांनी
विषारी औषध प्राशन करण्यामागे कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक किंवा अन्य कोणते कारण होते का, याबाबत
अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय
तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पलूस
पोलिस ठाण्यात दोन्ही मृत्यूंची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून
पुढील तपास सुरू आहे.