निर्जन शेतात अडीच कोटींचा गांजा; बारामती प्रकरणाचे ओडिशापर्यंत धागेदोरे, विकी कांबळे पोलिसांच्या जाळ्यात
बारामती : जळोची परिसरातील निर्जन शेतात दोन ड्रममध्ये सापडलेल्या तब्बल 478 किलो 950 ग्रॅम गांजा प्रकरणाचा तपास आता आंतरराज्यीय पुरवठा साखळीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी विकी विजय कांबळे याला 2 सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. न्यायालयाने त्याला 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या तपासानुसार गांजाचा मूळ स्रोत, ओडिशातून होणारी वाहतूक, स्थानिक पातळीवरील साठवणूक आणि वितरण याबाबत महत्त्वाचे धागेदोरे कांबळेच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे.
जळोचीतील निर्जन शेतात सापडला तब्बल 478 किलो
गांजा
28 फेब्रुवारी रोजी जळोची-पिंपळी रोड परिसरातील एका
शेतात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ‘समृद्धी अॅक्वा’ कंपनीचे 1500 लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक ड्रम ताब्यात घेतले. या ड्रममध्ये 465
पॅकेट्समध्ये 478 किलो 950 ग्रॅम गांजा आढळून आला. ड्रमसह या कारवाईत
सुमारे 2 कोटी 39 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कोणी आणला,
तो कुठून आणण्यात आला आणि त्याचे पुढे वितरण कोणाकडे होणार होते,
याचा तपास पोलिसांसमोर होता.
मोबाईल लोकेशन आणि वाहनांच्या हालचालींचा तपास
गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक तपासावर भर
दिला. मोबाईल सीडीआर, डम्प डेटा, आयएमईआय मॅपिंग,
मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि
संशयितांच्या वाहनांच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. तसेच
सहआरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीची इतर पुराव्यांच्या आधारे पडताळणी
करण्यात आली. या तपासात प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान
धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांची नावे समोर आल्याचे पोलिसांनी
सांगितले.
यापैकी प्रकाश काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार
सिंग आणि राहुल गोरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
ओडिशातील संपर्कामुळे तपासाला नवे वळण
तपासादरम्यान विकी कांबळेचा ओडिशातील जॉकी माझी याच्याशी
संपर्क असल्याचा धागा पोलिसांना मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जळोचीतील गांजा
प्रकरणामागे केवळ स्थानिक व्यवहार नसून आंतरराज्यीय पुरवठा साखळी असल्याची शक्यता
बळावली आहे. कांबळेच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीनंतर सांगली स्थानिक गुन्हे
शाखा आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून त्याला इनोव्हा वाहनासह ताब्यात
घेतले होते. वाहनाच्या तपासणीत 66 पॅकेट्स आणि एका स्वतंत्र पिशवीत एकूण 134 किलो गांजा आढळून आला. या कारवाईत वाहन, मोबाइल आणि गांजासह सुमारे 42 लाख 63 हजार 500 रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
बारामतीत आणखी 23 किलो गांजा जप्त
21 मे रोजी बारामतीतील गवारे चौकात पोलिसांनी 23
किलो 10 ग्रॅम गांजा
जप्त केला होता. फलटणकडून बारामतीच्या दिशेने गांजा आणला जात असल्याच्या
माहितीवरून इनोव्हा क्रिस्टा वाहन अडवून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात
तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. या तपासातही विकी कांबळे आणि संग्राम उर्फ चंदन
सिंग यांच्याशी संबंधित धागे समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बारामती शहर पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणांत मिळून 501 किलो 960 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सांगलीतील 134 किलो गांजाच्या कारवाईचा संदर्भ जोडल्यास या संबंधित तपासात एकूण 635 किलो 960 ग्रॅम गांजाचा मुद्दा पुढे येतो. विकी कांबळे याला 2 सप्टेंबर रोजी रात्री अटक केल्यानंतर 3 सप्टेंबर रोजी बारामतीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. गांजाचा मूळ स्रोत, ओडिशापासून बारामतीपर्यंतची वाहतूक, वापरण्यात आलेली वाहने, मोबाइल व डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर संशयितांची भूमिका तपासण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. त्यानंतर न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
पुरवठा साखळीत आणखी कोण?
आता पोलिसांकडून गांजाच्या मूळ पुरवठादारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
सुरू आहे. विशेषतः ओडिशातील संपर्क, जॉकी माझी आणि संग्राम उर्फ चंदन सिंग यांची भूमिका,
गांजा वाहतुकीसाठी वापरलेली वाहने, डिजिटल
पुरावे आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास केला जात आहे. ही कारवाई बारामती शहर पोलीस ठाण्याचे
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात
आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कारंडे तसेच बारामती शहर पोलीस ठाणे आणि
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी
असून, पोलिसांकडून तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जात
आहे.