पुण्यात खाकीवरच कोयत्याचा वार; गांजा पिणाऱ्या टोळक्याचा ड्युटीवरील पोलिसावर हल्ला

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायावर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांजवळ काही तरुण गांजा सेवन करत असल्याचे पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या निदर्शनास आले. ड्युटीवर असलेल्या बांबल यांनी संबंधित तरुणांना तेथून निघून जाण्यास सांगितले.

वादानंतर अचानक हल्ला

तरुणांना तेथून जाण्यास सांगितल्यानंतर त्यावरून पोलीस शिपाई बांबल आणि संबंधित टोळक्यामध्ये वाद झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर टोळक्यातील व्यक्तींनी बांबल यांच्यावर अचानक हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी आरोपींपैकी एकाने धारदार कोयत्याने अक्षय बांबल यांच्या गळ्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांवरच हल्ला झाल्याने खळबळ

ड्युटी बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनाच ड्युटीदरम्यान हल्ल्याला सामोरे जावे लागत असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोपींचा शोध सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते आणि आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पुण्यात यापूर्वीही कोयत्याने हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यावरच कोयत्याने हल्ला झाल्याने पोलीस प्रशासनाकडून या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.