जरांगेंची प्रकृती खालावली; उदय सामंतांचा फोन, मध्यरात्री सलाईन, वर्षा बंगल्यावर हाय व्होल्टेज बैठक
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण
सुरू असून, आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न-पाण्यासह वैद्यकीय उपचार नाकारल्याने
त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष त्यांच्या
प्रकृतीकडे लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन,
पाणी आणि इतर वैद्यकीय उपचार घेणे बंद केले होते. उपोषणस्थळी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष
ठेवण्यात येत होते.
उदय सामंतांचा जरांगेंना फोन
दरम्यान, काल रात्री मंत्री उदय सामंत यांनी
मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेनंतर जरांगे पाटील
यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सहमती दर्शवल्याची माहिती आहे. त्यानंतर मध्यरात्री
सुमारे दोन वाजता उपोषणस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली. डॉक्टरांच्या
देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे समर्थकांना काहीसा दिलासा
मिळाला असला, तरी जरांगेंची प्रकृती अद्याप चिंतेचा विषय
आहे.
वर्षा बंगल्यावर मंत्र्यांची महत्त्वाची बैठक
एकीकडे अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांच्या
उपोषणामुळे परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे मुंबईत मराठा आरक्षणाच्या
मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा
विविध मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत मनोज
जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलता
येतील, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आंदोलनस्थळी मराठा समाजाची मोठी गर्दी
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती समोर
आल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव
अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी
झाली असून, जरांगेंच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये
चिंता व्यक्त होत आहे. मध्यरात्री उपचार घेण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला
असला, तरी मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय
उपोषण सोडणार नसल्याची जरांगे पाटील यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे आता
सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि पुढील काळात चर्चेला कोणते स्वरूप येते,
याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.