मुंबईजवळील शहरात सीएकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार; ४९५ कोटी रुपये विदेशात वर्ग केल्याचा आरोप
मिरा भाईंदर : कंपन्यांचे तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपये भारतातून विदेशात बेकायदा
वर्ग केल्याप्रकरणी भाईंदरमधील एका चार्टर्ड अकाऊंटंटविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्रे देऊन बनावट खासगी
कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम विदेशात पाठवल्याचा आरोप संबंधित सीएवर करण्यात
आला आहे. भारतातून विदेशात जाणाऱ्या तसेच विदेशातून भारतात येणाऱ्या आर्थिक
व्यवहारांची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. या तपासादरम्यान भाईंदर
पश्चिमेतील विनायक रोड येथे कार्यालय असलेल्या सीए महेंद्र पुरोहित याने विदेशात
पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र चुकीच्या माहितीच्या आधारे जारी
केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
प्राप्तिकर नियमांनुसार पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम विदेशात
पाठवण्यासाठी सीएचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने या
प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला. तपासादरम्यान सीएच्या शिक्क्याने विविध नावांनी
नोंदवलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपये
विदेशात वर्ग केल्याचे आढळून आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यातील
बहुतांश कंपन्या बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. २०२२-२३
ते २०२५-२६ या चार वर्षांच्या कालावधीत ही आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले
आहे. याप्रकरणी सहायक कर अधिकारी सच्चिदानंद चौरसिया यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात
तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीए महेंद्र पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा
दाखल केला.
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेऊन भाईंदर
पोलिसांनी प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. सध्या या
प्रकरणाची प्राथमिक माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले
आहे. हा निधी नेमका कोणत्या कारणासाठी विदेशात पाठवण्यात आला, संबंधित
कंपन्यांना हा पैसा कशा प्रकारे प्राप्त झाला आणि या संपूर्ण व्यवहारामागे आणखी
कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला
जाणार आहे.