१२ कोटी जनतेच्या आशीर्वादांमुळेच पुरस्कार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडनमध्ये गौरव
लंडन : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ब्रिटनच्या संसदेतील
वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’
या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर
केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा आयोजित
करण्यात आला होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा सन्मान
महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या आशीर्वादांमुळे मिळाल्याचे सांगितले. हा
पुरस्कार आपण जनतेला समर्पित करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘१२ कोटी जनतेच्या आशीर्वादांमुळेच पुरस्कार’
ब्रिटिश संसदेत आपला सन्मान होणे हा अत्यंत आनंददायी अनुभव असल्याचे
शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेसाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ यांसारख्या
उपक्रमांची दखल घेतल्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी म्हटले. लंडन दौऱ्यात
उद्योजक, विद्यार्थी
तसेच महाराष्ट्र आणि भारतातील नागरिकांशी संवाद साधल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लंडनमध्येही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि मराठी अस्मितेचा प्रसार होत असल्याचे
पाहून आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले.
ब्रिटिश संसदेत मराठीतून भाषण
ब्रिटिश संसदेत मराठीतून भाषण करण्याची संधी मिळाल्याचा विशेष
आनंद असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कवी सुरेश भट यांची ‘लाभले
आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ ही कविता सादर केली. संपूर्ण दिवस महाराष्ट्र आणि
मराठी भाषेच्या वातावरणात व्यतीत झाल्याचे सांगत हा अनुभव आपल्यासाठी अविस्मरणीय
असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याच्या संधी
मुंबई आणि लंडन ही जगातील महत्त्वाची वित्तीय केंद्रे असल्याचे सांगत फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. मोदी हे व्हिजनरी आणि डायनॅमिक नेतृत्व असल्याचे सांगत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या सन्मान सोहळ्याला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस
आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक,
कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटिश संसदेचे सदस्य,
वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध
देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील
मान्यवर उपस्थित होते.