गणेशोत्सवाच्या काळात जळगावात हृदयद्रावक घटना; जवानाच्या पत्नीने पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपविले
जळगाव : गणेशोत्सवाच्या आनंदमय वातावरणात जळगाव शहरात एक
हृदयद्रावक घटना घडली. शहरातील तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ राहणाऱ्या २८
वर्षीय हेमांगिनी निखील महाजन यांनी आपल्या पाच वर्षांच्या मुलासह जीवन
संपविल्याची घटना समोर आली आहे. हेमांगिनी यांचे पती निखील महाजन हे भारतीय
सैन्यदलात राजस्थान येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. देशाच्या रक्षणासाठी
कार्यरत असलेल्या जवानाच्या कुटुंबावर अशी दुःखद घटना ओढवल्याने परिसरात हळहळ
व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास हेमांगिनी आणि
त्यांचा पाच वर्षांचा मुलगा घराच्या खालच्या मजल्यावर होते, तर
कुटुंबातील इतर सदस्य वरच्या मजल्यावर होते. सायंकाळी निखील महाजन यांच्या आई खाली
आल्या असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. वारंवार हाका मारूनही प्रतिसाद
न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली.
दरवाजा उघडल्यानंतर घरातील दृश्य पाहून कुटुंबीय आणि
शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी
धाव घेत तपास सुरू केला. महाजन कुटुंब परिसरात नम्र आणि मनमिळाऊ स्वभावासाठी
ओळखले जात होते. त्यामुळे या घटनेने तळेले कॉलनीसह संपूर्ण जळगाव शहरावर शोककळा
पसरली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांकडून
माहिती घेतली जात आहे. तपासानंतरच घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.