मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्णेतील शेतकरी तरुणाने जीवन संपविले; चिठ्ठीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा उल्लेख
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून परभणी
जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी गणेश
साहेबराव भोसले यांनी जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना १३ सप्टेंबर रोजी
सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भोसले यांच्या जवळ एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याबाबत तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्णा पोलिस ठाण्याचे पोहेकॉ वसंत राठोड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सुहागन गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आमदार राहुल पाटील यांची कुटुंबीयांची भेट
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी उबाठा शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी गणेश भोसले यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आमदार राहुल पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून, समाजातील युवक टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगत सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच गणेश भोसले यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सर्वजण मिळून घेणार असल्याचे आमदार राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले. या वेळी साहेबराव कल्याणकर, माणिकराव सूर्यवंशी, खुशाल भोसले, जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले, सरपंच दाजीबा भोसले, गणेशराव भोसले, माऊली भोसले, दौलत भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.