‘रुद्रांश कसा आहे?’ पंतप्रधान मोदींनी घेतली एकनाथ शिंदेंच्या नातवाची आवर्जून विचारपूस; भेटीत नेमकी काय चर्चा?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकतीच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आता हे प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र, भेटीदरम्यान झालेली एक कौटुंबिक विचारपूस विशेष चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांचा नातू रुद्रांश याचीही आवर्जून आठवण काढल्याचे समजते.

मोदींनी रुद्रांश कसा आहे?” अशी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. या आपुलकीच्या संवादामुळे भेटीचा हा भागही चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्याच्या विकासकामांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. त्यांनी भेटीतील राजकीय चर्चेबाबत अधिक माहिती देणे टाळले. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठकही घेतली. ही बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील खासदारांची भेट घेतली होती.