'शिवरत्न' सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील 'शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलण्याचा ठराव रद्द करून
गेली अनेक दशके प्रचलित असलेले 'शिवरत्न' हेच नाव कायम ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन देऊन केली. निवेदनात म्हटले आहे की,
सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सभागृहाला 'शिवरत्न' हे नाव देण्यात आले होते. हे नाव छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ देण्यात आले असून त्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे हे नाव बदलण्याचा निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील जनभावनांचा अनादर करणारा असल्याची भावना निवेदनात व्यक्त
करण्यात आली आहे.
पुढे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, 'शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून भारतरत्न अटलबिहारी
वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
यांच्या कार्याबाबत कोणताही विरोध नसून, त्यांच्या नावाने
नवीन सभागृह किंवा अन्य सार्वजनिक वास्तू उभारून त्यास त्यांचे नाव देण्यात यावे,
अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. मात्र, चार
दशकांपासून अस्तित्वात असलेले 'शिवरत्न' हे नाव कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी
अधिकारी कुशल जैन यांना भगवान शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची 'शिवरत्न' संकल्पनेवर आधारित प्रतिमा भेट देण्यात
आली. या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, दक्षिण
सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, जनरल सेक्रेटरी
चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष प्रवीण इरत शेट्टी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष पद्मसिंह शिंदे, सामाजिक
न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजित पात्रे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.