‘इश्क का पर्चा’ने सोलापूरकरांना हसवून केले चिंब; नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात

सोलापूर : अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कै. प्रमोद खांडेकर सांस्कृतिक नाट्य महोत्सवाची ६ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाचे उद्घाटन अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे आणि युवा उद्योजक ज्योतिबा गुंड यांच्या हस्ते कै. प्रमोद खांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आनंद जाधव लिखित आणि किरण लोंढे दिग्दर्शित ‘इश्क का पर्चा’ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकाने सोलापुरातील नाट्यरसिकांना तब्बल तीन तास हास्याच्या पावसात चिंब भिजवले. नाटकाची उत्तम मांडणी, अप्रतिम प्रकाशयोजना, संगीताची साथ आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. नाटकातील प्रत्येक विनोदी प्रसंगाला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद मिळत होती.

किरण लोंढे यांनी दिग्दर्शनासोबतच दमदार अभिनय करत प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली. तसेच अभिजित दुपारगुडे, अक्षय कोरडे आणि समृद्धी भोसले यांच्या सहजसुंदर अभिनयाला नाट्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकात यश क्षीरसागर, आदित्य पांडे आणि मीनल चव्हाण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. नेपथ्याची जबाबदारी सोमनाथ लोखंडे, प्रकाशयोजना कृतार्थ कनसारा आणि संगीत साथ आयुष लोकरे यांनी सांभाळली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘इश्क का पर्चा’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील दोन दिवसांच्या नाट्यप्रयोगांबाबतही सोलापूरच्या नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महोत्सवाचे प्रमुख संयोजक ॲड. बसवराज सलगर यांनी ही माहिती दिली. यावेळी संजय सावंत, विजय साळुंखे, अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे, सचिन जगताप, आशुतोष नाटकर, दीपक काळे, अशपाक नदाफ, सागर देवकुळे आणि ओंकार साठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.