राष्ट्रीय हातमाग दिनी सोलापुरातील विणकरांचा सन्मान; हातमाग प्रदर्शन व संग्रहालयासाठी महापालिका सकारात्मक

सोलापूर : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विणकर बाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते हातमागावर काम करणाऱ्या विणकराच्या प्रतीकात्मक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोलापूरच्या ऐतिहासिक हातमाग परंपरेला यावेळी सलाम करण्यात आला. हातमाग उद्योगात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विणकर बांधवांचा महापौर विनायक कोंड्याल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण फलमारी, नागनाथ वंगा, विजय बडगु, व्यंकटेश येमूल, महेश संचू, सत्यनारायण गंगा, श्रीनिवास अनंतुल तसेच झुंजा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सोलापूर शहर भाजपच्या वतीनेही राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांना विशेष सन्मानपत्र देण्यात आले. सोलापूरच्या जागतिक कीर्तीच्या हातमाग उद्योगाचा गौरव करत ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेला बळ देण्यासाठी विणकरांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

हातमाग संग्रहालयाची मागणी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोक इंदापुरे यांनी सोलापूरच्या समृद्ध हातमाग इतिहासाचे जतन करण्यासाठी विणकर बाग येथे दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सात दिवसांचे हातमाग प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी केली. तसेच पारंपरिक विणकामाची साधने, विविध वस्त्रप्रकार, हातमाग उद्योगाचा इतिहास आणि विणकर समाजाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारावे, अशी मागणीही करण्यात आली.

महापौर विनायक कोंड्याल यांचे आश्वासन

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, सोलापूरची ओळख हातमाग उद्योग आणि विणकरांच्या कष्टाळू परंपरेमुळे देशभर निर्माण झाली आहे. हजारो विणकरांच्या अथक परिश्रमातून सोलापुरी चादर, टॉवेल आणि इतर हातमाग वस्त्रांनी देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा अमूल्य वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

विणकर समाजाने मांडलेल्या सात दिवसांच्या हातमाग प्रदर्शनाची तसेच कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारण्याची मागणी रास्त असून, महानगरपालिका प्रशासनाकडून त्याचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही महापौरांनी स्पष्ट केले. हातमाग उद्योगाला चालना देणे, विणकरांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि सोलापूरचा सांस्कृतिक व औद्योगिक वारसा जतन करणे यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हातमाग उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान, नव्या बाजारपेठा आणि युवकांचा सहभाग मिळवून देण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे महापौरांनी नमूद केले. लोकल ते ग्लोबल’ संकल्पनेनुसार सोलापूरच्या हातमाग उत्पादनांचा देश-विदेशात अधिक व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, डॉ. अजय पोन्नम, सत्यनारायण गुर्रम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विणकर समाजाचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.