ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या चौकशीचे CM फडणवीसांचे आदेश
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधील
कथित देणगी घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश
दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांतील मंदिरातील देणगी आणि
दानसंकलनाची तपासणी केली जाणार आहे. २०२३ ते २०२६ या कालावधीत देणगी संकलनात
झालेल्या चढ-उतारांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिंदे गटाचे नेते तथा ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर
यांनी मंदिर ट्रस्टमधील कथित अनियमिततेबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देत तातडीने
अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, सदा सरवणकर आणि ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी बुधवारी
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याआधी सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. ट्रस्टमधील कथित अनियमिततेप्रकरणी सदा सरवणकर
यांनी यापूर्वीच्या ट्रस्ट सदस्यांवर आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या चौकशीत आर्थिक अनियमितता, देणगीतील तफावत, चोरी किंवा प्रशासकीय त्रुटी झाल्या आहेत का, याचा तपास केला जाणार आहे. त्यासोबतच गेल्या पाच वर्षांतील देणग्या आणि मंदिरातील मौल्यवान वस्तूंचेही ऑडिट करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, या चौकशीमुळे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टशी संबंधित राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता असून, चौकशीच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.