MPSC विद्यार्थी आंदोलनाला यश; विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, ५ सदस्यीय चौकशी समिती स्थापन
पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या
आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री आंदोलन
स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी
चर्चेनंतर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण
होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच MPSC
प्रकरणाच्या चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या
समितीच्या सचिवपदी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात येणार
आहे. राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांच्या
मागण्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली.
MPSC प्रकरणाच्या चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती
या चौकशी समितीच्या अध्यक्षपदासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या नावाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समितीमध्ये माजी न्यायाधीश न्या. पी. डी. नाईक, प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे, सेवानिवृत्त सचिव गणेश पाटील आणि पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांचा समावेश असेल. तुकाराम मुंढे समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. MPSCच्या कामकाजात पारदर्शकता आणणे, परीक्षा प्रक्रियेतील अडचणींचा अभ्यास करणे आणि आवश्यक सुधारणांबाबत शिफारशी करणे, हे या समितीचे प्रमुख उद्देश असतील.
रोहित पवार ११ दिवस आंदोलनस्थळी उपस्थित
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी शरद पवार गटाचे
नेते आमदार रोहित पवार हे आंदोलनाच्या ठिकाणी सलग ११ दिवस उपस्थित होते. त्यांच्या
नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन
मागे घ्यावे, यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रोहित
पवार आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान सरकारने मान्य
केलेल्या मागण्यांची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत, सरकारने
मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदा शिवेंद्रराजे भोसले यांनी रोहित पवार यांच्याकडे
दिला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे
घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
आंदोलनाच्या यशानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष
सरकारकडून निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी
जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांना खांद्यावर घेत आनंद व्यक्त केला. या
आनंदोत्सवाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला. ‘MPSC विद्यार्थी
सत्याग्रहाचा अखेर विजय…! विजय एकजुटीचा, जिद्दीचा आणि
चिकाटीचा…!’ अशा शब्दांत त्यांनी आंदोलनाच्या यशावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
विवेक भीमनवार यांचा रजेवर जाण्याचा निर्णय
दरम्यान, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनीही या प्रकरणावर
प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने MPSC पेपरफूट प्रकरणात
चौकशीची घोषणा केल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता रजेवर
जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. MPSCची
स्वायत्तता, विश्वासार्हता आणि विद्यार्थीहिताला कायम
प्राधान्य असल्याचेही भीमनवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.