वारद चाळ नवरात्र महोत्सवात भव्य लेझिम सोहळा; हजारो लेझिमपटूंच्या मर्दानी खेळाने दत्त चौक दुमदुमला
सोलापूर येथील वारद चाळ नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने
सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, ११ ऑक्टोबर रोजी श्री देवी आगमन मिरवणूक आणि भव्य
लेझिम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दत्त चौक येथून या सोहळ्याचा शुभारंभ झाला. यावेळी
हजारो लेझिमपटूंनी शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण मर्दानी लेझिम खेळ सादर करून
उपस्थितांची मने जिंकली. ढोल-ताशांचा गजर, लेझिमचा ताल आणि
श्री देवीच्या जयघोषामुळे संपूर्ण दत्त चौक परिसर भक्तिमय तसेच उत्साहपूर्ण
वातावरणाने भारावून गेला.
हजारो लेझिमपटूंच्या सादरीकरणाने सोहळ्याची रंगत
मंडळाचे आधारस्तंभ तथा नगरसेवक चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली
आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात हजारो लेझिमपटूंनी सहभाग घेतला. शिस्तबद्ध, तालबद्ध
आणि जोशपूर्ण मर्दानी लेझिमच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. पारंपरिक
लेझिमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन यावेळी
घडले. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, नागरिकांची मोठी उपस्थिती
आणि श्री देवीच्या स्वागतासाठी जमलेला भाविकांचा जनसमुदाय यामुळे दत्त चौक परिसर
उत्सवमय झाला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सोलापूरचे
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा
नगरसेवक अमोल शिंदे, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. नितीन हबीब, गणेश आप्पा नरोटे, मंडळाचे अध्यक्ष राजू पुठ्ठा आणि
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते.
१९७५ पासून धार्मिक-सामाजिक परंपरेचे जतन
सन १९७५ मध्ये स्थापन झालेल्या वारद चाळ नवरात्र महोत्सव तरुण मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली आहे. मंडळाचे आधारस्तंभ चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक उत्सवांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य सुरू आहे. यंदाच्या श्री देवी आगमन मिरवणूक आणि भव्य लेझिम सोहळ्याच्या माध्यमातूनही ही परंपरा उत्साहात पुढे नेण्यात आली.