नवरात्रोत्सवासाठी रूपाभवानी मंदिर परिसराची महापौरांकडून पाहणी; गर्दी, स्वच्छता अन् पाणी व्यवस्थेचा आढावा
सोलापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिरात
दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर
महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आज मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी भाविकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध
व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
गर्दी नियंत्रण आणि दर्शनरांगेचे नियोजन
नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या ये-जा करण्याचे मार्ग, दर्शनरांग आणि गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भाविकांना मंदिरात सुलभ प्रवेश मिळावा तसेच दर्शनानंतर सुरक्षितपणे बाहेर पडता यावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वच्छता, पाणी आणि प्रकाश व्यवस्थेवर भर
उत्सव काळात मंदिर परिसरात नियमित स्वच्छता, कचरा संकलन तसेच आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याबाबत
प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची
व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत
नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही पाहणी करण्यात
आली.
प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “नवरात्रोत्सव हा नागरिक आणि देवीच्या भाविकांसाठी श्रद्धेचा महत्त्वपूर्ण
उत्सव आहे. रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा
त्रास किंवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका
प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि निर्विघ्न दर्शन मिळावे, याला
प्रशासनाचे प्राधान्य राहील.”
उत्सव काळात स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश
व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि इतर नागरी सुविधांबाबत संबंधित
विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
मंदिर प्रशासन आणि उत्सव समितीसोबत चर्चा
पाहणीदरम्यान रूपाभवानी मंदिर प्रशासन तसेच उत्सव
समितीच्या पदाधिकाऱ्यांशी महापौरांनी चर्चा करून उत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक
बाबींची माहिती घेतली.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ.
सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक गौतम कसबे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त युवराज
गाडेकर, नगर अभियंता नीलकंठ मतपती, विभागीय
अधिकारी श्री. बक्षी, मंदिराचे पुजारी मल्लिनाथ मसरे, राजू पवार तसेच रूपाभवानी मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष व ट्रस्टी
उपस्थित होते.